राजापूर/नाटे : कोकणातील वळणावळणाचे रस्ते आणि तीव्र उतार पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहेत. राजापूर (Rajapur) तालुक्यातील आंबेरी पुलाजवळ (Amberi Bridge) घडलेल्या एका भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे. चिकन आणण्यासाठी गेलेल्या या तरुणाची बाईक उतारावर अनियंत्रित होऊन हा अपघात घडला. याप्रकरणी मयत तरुणावरच निष्काळजीपणाचा ठपका ठेवत नाटे पोलीस ठाण्यात (Nate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.१५ च्या दरम्यान घडला. मात्र, याप्रकरणी गुन्हा १ जानेवारी २०२६ रोजी दाखल करण्यात आला आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील (संतकबीर नगर) आणि सध्या नाणार (Nanar) येथे राहणारा प्रदिप शिवप्रसाद (वय २३) हा तरुण आपल्या एम.एच ०७ के ७८२७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून कात्रादेवी सागवे येथे चिकन आणण्यासाठी गेला होता. तिथे त्याला गणेश रमेश घाडी (वय ३८, रा. तिरलोट भाकरवाडी, ता. देवगड) हा ओळखीचा व्यक्ती भेटला. गणेश याने प्रदिपला ‘मला आंबेरी येथे घरी सोडून ये,’ अशी विनंती केली. त्यानुसार प्रदिप गणेशला डबलसीट घेऊन आंबेरीच्या दिशेने निघाला.
घोडेपोईच्या उतारावर घात
प्रदिप त्याची बाईक घेऊन घोडेपोई (Ghodepoi) येथील तीव्र उतारावरून जात असताना, गाडीचा वेग जास्त असल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. आंबेरी पुलाच्या अलीकडे आल्यावर सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही बाईक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या साईडपट्टीवर जाऊन जोरात आदळली. या अपघातात चालक प्रदिप आणि मागे बसलेला गणेश हे दोघेही रस्त्यावर पडले.
उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी ओरस सिव्हिल हॉस्पिटल (Oras Civil Hospital) येथे दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता प्रदिप शिवप्रसाद याचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल
याप्रकरणी फिर्यादी हेमंत सिताराम चव्हाण (वय ३८, रा. साखर सडे, चव्हाणवाडी, राजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाटे पोलिसांनी मयत आरोपी प्रदिप शिवप्रसाद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याने हलगर्जीपणाने आणि बेदरकारपणे गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूस आणि गणेश घाडी यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा (गुन्हा रजिस्टर नंबर ०१/२०२६) दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 02-01-2026














