रत्नागिरीत बार असोसिएशनतर्फे उद्या संविधान अमृत महोत्सव

रत्नागिरी : भारतीय संविधान अमृत महोत्सव रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता हॉटेल विवेक येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्नजी वराळे, न्या. श्रीराम मोडक, महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल अॅड. मिलिंद साठे, जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, जगातील सर्वात मोठे असलेले भारतीय संविधान राष्ट्राची कोनशिला आहे. भारतीय राज्यघटना सामाजिक क्रांतिचा दस्तऐवज आहे. कुठल्याही संविधानाचे सरासरी आयुष्य वीस वर्ष आहे. मात्र भारतीय संविधानात ७५ वर्षे उलटूनही आज १४५ कोटी भारतीयांना एकत्र बांधण्याची ताकद आहे.

संविधानाचा पहिला मसुदा १८९५ साली तयार झाला, त्याचे अभ्यासकर्ते लोकमान्य टिळक होते. १९१९ साली केवळ ३ टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. साऊथ गोरस कमिटीसमोर ऐतिहासिक साक्ष डॉ. आंबेडकर यांनी दिली आणि मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त लोकांना मिळाला पाहिजे, महिलांनाही मतदानाचा अधिकार असला पाहिजे असे म्हणणे मांडले. त्याकाळी अमेरिकेतही महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांची दूरदृष्टी म्हणजे काळाच्या पुढे असल्याचे निदर्शक होते. भारतीय लोक आणि पक्ष कसे वागतात यावर संविधानाचे भवितव्य अवलंबून आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अॅड. निनाद शिंदे, अॅड. शाल्मली आंबुलकर, अॅड. रत्नदीप चाचले, अॅड. अवधूत कळंबटे, अॅड. राहूल चाचे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 02/Jan/2026