दापोली शहराच्या विकासासाठी साडेअकरा कोटींचा निधी मंजूर

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध विकासकामांसाठी साडेअकरा कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे.

मंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून मिळालेल्या जिल्हा नियोजन निधीतून मौजे दापोली येथे स्मशानभूमीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच शहरातील मासळी मार्केट ते मंडणगड मार्गावरील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले असून, यासाठी स्थानिक आमदार निधीतून १० लाख आणि नगरपंचायतीच्या स्वनिधीतून साडे सहा लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.

शहरातील डम्पिंग ग्राउंडमधील घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून, मुख्य रस्त्यांची दररोज रात्री नियमित स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. तसेच खोंडे परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यात येणार असून, सोंडेघर पाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लागणार असल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. साडे अकरा कोटी रुपयांच्या या निधीतून शहरातील विविध विकासकामे वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास नगराध्यक्ष कृपा घाग यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पाणी नियोजनावर होणारा वाढता खर्च लक्षात घेता २०११ नंतर प्रथमच पाणीपट्टीत सुधारणा करण्यात आली असून, १ हजार २०० रुपयांची पाणीपट्टी वाढवून १ हजार ८०० रुपये करण्यात आली आहे. तरीही नगरपंचायतीवर आर्थिक भार कायम राहणार असल्याचे न.पं. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 02/Jan/2026