रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षीय चिमुकल्याला रिक्षाने उडवलं; माळनाका-संमित्रनगर रोडवरील घटना

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील (Ratnagiri City) वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या माळनाका ते संमित्रनगर रोडवर एका ८ वर्षीय शाळकरी मुलाला रिक्षाने धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्के हायस्कूलच्या (Shirke High School) गेटसमोरच हा अपघात घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अपघातात चिमुकला जखमी झाला असून, रिक्षाचालकाच्या हलगर्जीपणाबद्दल रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी १ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिर्के हायस्कूल गेट नंबर २ जवळून एक ८ वर्षीय मुलगा रस्ता ओलांडत होता. शाळा सुटल्यानंतर किंवा क्लासच्या वेळी या भागात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्याच वेळी माळनाका बाजूकडून संमित्रनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षाने (क्रमांक एम.एच. ०८ बी.सी ०८०४) या मुलाला जोरदार धडक दिली. रिक्षाचालकाने रस्त्याची परिस्थिती आणि शाळेचा परिसर लक्षात न घेता, अविचाराने आणि भरधाव वेगाने रिक्षा चालवल्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये सदर लहान मुलगा जखमी झाला आहे.

रिक्षाचालकावर गुन्हा

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश कृष्णा पवार (नेमणूक- रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालक प्रकाश दत्ताराम मांडवकर (वय ६३, रा. सुपलवाडी, रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५(अ) (दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणे) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा (गुन्हा रजिस्टर नंबर ०१/२०२६) दाखल केला आहे. शाळेच्या आवारात वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात असतानाही अशा घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 02-01-2026