एसटी चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एसटी विभागातील चालक, वाहकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, एसटी चालवताना फोनवर बोलू नये, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची सुरक्षितता हे आपले कर्तव्य असून अपघात होवू नये यासाठी नियम पाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी विजय देसाई यांनी सुरक्षितता अभियानात एसटी कर्मचाऱ्यांना केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी आगारात सुरक्षितता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन गुरुवारी प्रांताधिकारी विजय देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे हे होते. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे म्हणाले, सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून यंदाही चालक, वाहक व यांत्रिकी अपघातविरहीत सेवेसाठी प्रोत्साहन कर्मचारी यांना दिले जाणार आहे.

प्रवाशांचा प्रवास सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्य असा संकल्प महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे दरवर्षीच ही राबवतो, कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, अपघात होवू नये याची दक्षता घ्यावी. यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वानाथ खेडकर, सहा मोटार वाहन निरीक्षक अवधुत कुंभार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, आगार व्यवस्थापक बालाजी आडसुळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आगार व्यवस्थापक बालाजी आडसुळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 02/Jan/2026