रत्नागिरी : प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळक व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील सर्वच एसटी बसस्थानकात स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंत, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जमट यांचे निमूर्लन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डवे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पिण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून, प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही बसस्थानकावर अक्षम्य दुर्गंधी, अस्वच्छता आहे. त्यामुळे ही मोहीम राबवल्यास बसस्थानके चकाचक होतील. प्रवाशांना बसण्यासाठी चांगले होईल. सामाजिक संस्था, नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेवून मोहिमेत सहभागी नोंदवणे गरजेचे आहे- विठ्ठल काळे, प्रवासी, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 PM 03/Jan/2026














