संशयित रुग्णवाहिकांची तपासणी करावी : अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे

रत्नागिरी : एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्क राहून वाहनांची तपासणी करावी. रिकाम्या फिरणाऱ्या संशयित रुग्णवाहिकांचीदेखील तपासणी करावी, अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिली.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशाने विविध पथकांनी विधानसभा मतदार संघात जाऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. त्याअंतर्गत २६४-गुहागर विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीबाबत बर्गे यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, तहसीलदार परिक्षीत पाटील आदी उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी बर्गे म्हणाले, दिवाळीच्या तोंडावर भेट वस्तूंच्या नावावर काही संशयास्पद साहित्यांची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी छोट्या वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांचीदेखील कसून तपासणी करावी. वाहनातील संशयास्पद जागा प्राधान्याने पाहाव्यात. अशा ठिकाणी मद्यसाठा, अवैध रोकड लपवलेली असू शकते. अद्याप कोणतीही कारवाई एफएसटी, एसएसटी यांच्याकडून झालेली दिसत नाही. पोलिस, उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक या सर्वांनीच त्यासाठी अलर्ट मोडवर रहावे. निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.

या मतदार संघात १ लाख १५ हजार ३२९ पुरुष मतदार संख्या, तर १ लाख २६ हजार ९७६ स्त्री मतदार संख्या अशी एकूण २ लाख ४२ हजार ३०५ मतदार संख्या आहे. ३२२ मतदान केंद्रांवर ३२२ व्हील चेअर्स उपलब्ध आहेत. फिरत्या पथकांनी २१५१ वाहनांची तपासणी केली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकांनी २१७१ वाहनांची तपासणी केली आहे. उत्पादन शुल्क विभागामार्फत ९३ हजार ७३० रुपयांची २ हजार १०३ लि. अवैध तसेच गोवा बनावटीचे मद्य पकडले आहे. त्याचबरोबर मतदान जनजागृती विविध कार्यक्रम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मतदान केंद्रांना भेटी
अप्पर जिल्हाधिकारी बर्गे यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली क्र. २, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबलोली नं. २ पागडेवाडी, स्थिर सर्वेक्षण पथक आबलोली चेक पोस्ट, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वरवेली नं.२, श्रीमती रकुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पालशेत येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधेची पाहणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 28/Oct/2024