महायुतीचे सरकार गतिमान काम करणारे सरकार दिसेल असे काम करा : भाजप नेते प्रशांत यादव

चिपळूण : लोकप्रतिनिधी निवडून आल्याने नगरपालिकेत कारभार करण्यासाठी आता कारभारी मिळाले असून, विकासाला गती मिळणार आहे. महायुतीचे सरकार खऱ्याअर्थाने गतिमान काम करणारे सरकार असल्याची झलक काही दिवसातच दिसेल असे काम करा, असे आवाहन भाजप नेते प्रशांत यादव यांनी केले.

चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहोळा सोमवारी दुपारी उत्साहात पार पडला.

यावेळी यादव बोलत होते. यादव पुढे म्हणाले, महायुतीचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह सर्व नगरसेवकांवर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. हे लोकप्रतिनिधी कोणत्याही एका पक्षाचे नसून जनतेचे सेवक आहेत. त्यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. शहरात अनेक प्रश्न असून लवकरच प्रशासन, लोकप्रतिनिधींनी विविध क्षेत्रातील लोकांची बैठक घ्यावी, लोकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी नियोजन करावे. विकासाचे बदलते चित्र दिसायला हवे.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी, चिपळूण नगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला याचा आनंद असून जनतेने महायुतीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे असे मत व्यक्त केले. माजी आमदार विनय नातू यांनी महायुतीचे सरकार भक्कम असून आदर्शवत काम करण्याचा प्रयत्न करा व जनतेचा विश्वास सार्थ ठरवा, असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोर, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश आयरे, रुपेश घाग, भाजपचे तालुकाप्रमुख विनोद भुरण, आरती सकपाळ, प्राजक्ता टकले, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नगरसेविका सफा गोठे, नगरसेवक अजय भालेकर, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, तालुका सचिव उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, विलास खेराडे, श्रीराम खरे, सारिका भावे, रुही खेडेकर, सुषमा कासेकर, रत्नदीप देवळेकर, डॉक्टर विजय रीळकर, डॉ. अब्बास जबले, रामदास राणे, उदय उतारी, सुनिल जांभेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर, तर आभार प्रदर्शन नगरसेवक कपिल शिर्के यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 02/Jan/2026