देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनवडे संचलित माध्यमिक विद्यालय, सोनवडे (ता. संगमेश्वर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संगमेश्वरच्यावतीने ग्राहक पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रा. धनंजय दळवी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशालेच्या शिक्षिका सुलेखा मोहिते यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानाचा उद्देश व महत्त्व विशद केले आणि मार्गदर्शक प्रा. दळवी यांचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक शिवाजी बंडगर यांनी प्रा. दळवी यांचे पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षक सुजय सरदेसाई यांची उपस्थिती होती.
प्रा. धनंजय दळवी यांनी विद्यार्थ्यांना “ग्राहकांचा ग्राहक चळवळीतील सहभाग व जबाबदाऱ्या” आणि “भविष्यातील शिक्षण व करिअरमधील संधी” या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. प्रा. दळवी यांनी “ग्राहकांचा ग्राहक चळवळीतील सहभाग व जबाबदाऱ्या” या विषयावर मार्गदर्शन करताना ग्राहकांनी खरेदी करताना घ्यावयाची काळजी, खरेदीतील फसवणूक टाळण्याकरता घ्यावयाची दक्षता, ग्राहक संरक्षण कायदाः २०१९ मधील ग्राहक संरक्षणासाठी असणाऱ्या तरतुदी, ग्राहकांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या, अन्नपदार्थात केली जाणारी भेसळ व याबाबत ग्राहकांनी घ्यावयाची काळजी उदाहरणासह स्पष्ट केली. सायबर फसवणूक कशाप्रकारे होते व अशावेळी काय काळजी घ्यावी याबाबतचा सविस्तर आढावा घेतला.
प्रा. धनंजय दळवी यांनी “भविष्यातील शिक्षण व करियरमधील संधी” याबाबतचे मार्गदर्शन करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण पद्धतीत झालेले बदल व त्याला सामोरे जाताना आपली कौशल्य व आवड कशाप्रकारे जपली पाहिजे हे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. वाणिज्य, कला व किमान कौशल्यावर आधारित कोर्समधील शिक्षणात असणाऱ्या भविष्यातील करियर संधी याबाबत विवेचन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता व अंगभूत कौशल्याचा विचार करून दहावीनंतरचे शिक्षण घेऊन आपल्या भवितव्याला आकार देण्याचे आवाहन करून, आपल्या मार्गदर्शनाला विराम दिला. मुख्याध्यापक श्री. बंडगर यांनी आभार व्यक्त केले. या मार्गदर्शन कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांसह शिक्षक अमृत मेंगाल, अभिजीत कदम, सायली बनकर, विनायक मोहिते, प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिपिक लक्ष्मीकांत गवाणकर, सहाय्यक अजित पुरोहित, गजानन निमजे व विशाल जाधव यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 02/Jan/2026














