खेड : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढवणार असल्याची अधिकृत व ठाम घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार खा. सुनील तटकरे यांनी खेड येथे केली. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विश्वासात न घेतल्याचा अनुभव आल्याने, यापुढे स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खा. तटकरे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. कार्यकर्त्यांची ही आग्रही मागणी आणि पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम बांधणी असून, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वबळाची भूमिका स्वीकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्यात आपली स्वतंत्र राजकीय ताकद दाखवून देईल, तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे लढा देणारी ताकद म्हणून उभी राहील, असेही खा. तटकरे यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, खेड तालुक्यातील भडगाव-खोंडे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला. हा भव्य आणि उत्साहपूर्ण पक्षप्रवेश सोहळा खेड शहरातील तटकरे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई बोत्रे, तालुकाध्यक्ष संजय जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सखाराम तुकाराम कदम, उमेश देवरुखकर, सचिन पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजयशेठ बिरवटकर यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. कार्यक्रम उत्साही वातावरणात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या गजरात पार पडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 02/Jan/2026














