रत्नागिरीत क्रिकेटचा ‘महाकुंभ’! ३ जानेवारीपासून रंगणार ‘क्रिस्टल चषक’ अंडरआर्म टर्फ स्पर्धेचा थरार; दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आणि प्रवीण आमरेंच्या शुभेच्छा

◼️ उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; विजेत्यांना मिळणार रोख २५,५५५ आणि आकर्षक चषक

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रत्नागिरीतील (Ratnagiri) क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत आणि लांजा-राजापूरचे आमदार किरणजी सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य ‘क्रिस्टल चषक २०२६’ (Crystal Trophy 2026) अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नाचणे (Nachane) येथील शिवरुद्र टर्फवर हा क्रिकेटचा थरार रंगणार असून, ‘क्रिस्टल ग्रुप’ने या क्रीडा मेजवानीचे आयोजन केले आहे.

दिग्गज क्रिकेटपटूंच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

या भव्य स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. ३ जानेवारी) दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याला रत्नागिरीच्या क्रिकेट विश्वात मोलाचे योगदान देणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मुंबईच्या सेंट्रल रेल्वेकडून रणजी खेळलेले ज्येष्ठ प्रशिक्षक हरीश लाडे, रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव दीपक मोरे, ‘यंगबॉईज’चे हुकमी फलंदाज सुरेश जैन, वेगवान गोलंदाज सईद मुकादम, अष्टपैलू खेळाडू दिवाकर मयेकर आणि महिला क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या योगिता महाकाल यांचा समावेश आहे. या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे नवोदित खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.

प्रवीण आमरेंच्या शुभेच्छा आणि लाईव्ह प्रक्षेपण

या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे आयपीएलमधील (IPL) दिल्ली संघाचे प्रशिक्षक आणि प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी व्हिडिओद्वारे या स्पर्धेला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे TennisCricket.in या प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाणार आहे. स्पर्धेचा दर्जा राखण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची (MCA) परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच सामन्यांचे काम पाहणार आहेत.

महिलांचा प्रदर्शनीय सामना (Show Match)

स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी रविवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीतील महिलांच्या दोन संघांत प्रदर्शनीय सामना खेळवला जाईल. हा सामना ‘श्री साई स्पोर्ट्स’ आणि ‘अश्वमेध क्रिकेट अकॅडमी’ यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी राजेश सोहोनी अँड कंपनी तसेच एंजल ब्रोकिंग्ज कडून विशेष ट्रॉफीज देण्यात येणार आहेत.

बक्षिसांची लयलूट:

विजेत्या संघांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे: प्रथम क्रमांक (विजेता): ₹ २५,५५५/- आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक (उपविजेता): ₹ १५,५५५/- आणि आकर्षक चषक मॅन ऑफ दि सिरीज: ₹ २,५५५/- रोख, चषक, बॅट आणि ब्लूटूथ स्पीकर वैयक्तिक बक्षिसे: उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक (प्रत्येकी ₹ १,१११/- व चषक) मॅन ऑफ द मॅच: प्रत्येक सामन्यासाठी स्पोर्ट जर्कीन आणि रत्नविहार गिफ्ट हॅम्पर.

रत्नागिरीतील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी क्रिस्टल ग्रुपने हे नेटके नियोजन केले आहे. तरी या रोमांचक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी शिवरुद्र टर्फ, शांतीनगर (नाचणे) येथे क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:49 02-01-2026