Chiplun : चिंचनाका येथील एस.टी. थांब्यामुळे वाहतूक कोंडी

चिपळूण : शहरातील चिंचनाका मोठ्या परिसरात असलेला एस.टी. बस थांबा सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. या ठिकाणी थांबणाऱ्या एस.टी. बसेसमुळे मुख्य रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जाम होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

भर बाजारपेठेतील चिंचनाका हा चिपळूणमधील अत्यंत वर्दळीचा चौक आहे. बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, तसेच अंतर्गत रस्त्यांना जोडणारा हा मार्ग दिवसभर गजबजलेला असतो. अशा ठिकाणी एस.टी. बस रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतुकीचा वेग पूर्णतः ठप्प होते. विशेषतः सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे चिंचनाका येथील हा एस.टी. थांबा रद्द करून तो भोगाळे परिसरात मोकळ्या व तुलनेने सुरक्षित जागेत स्थलांतरित करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्या ठिकाणी बस थांबवल्यास मुख्य चौकावरील ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

वाहतूक पोलिस, एस.टी. महामंडळ आणि नगरपरिषदेने याबाबत संयुक्तपणे विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा रोजची वाढती वाहतूक कोंडी ही केवळ त्रासदायकच नव्हे, तर अपघातांना आमंत्रण देणारी ठरू शकते. चिपळूणच्या सुव्यवस्थित वाहतुकीसाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज स्पष्टपणे जाणवत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 02/Jan/2026