लांजा : तालुक्यातील पुनस कुर्णे मार्गावर चाफेट येथील अक्षय शिंदे यांचे रस्त्यात पडलेले पैशांचे पाकीट (वॉलेट) कुर्णे येथील अनिल रत्नाकर घडशी यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मंगळवारी लांजा येथे आठवडा बाजार असल्याने चाफेट येथील अक्षय अरविंद शिंदे हे लांजा येथे जात होते. त्यावेळी कुर्णे घडशीवाडी ते देवधे दरम्यान शिंदे यांचे पाकीट रस्त्यावर पडले. ते अनिल घडशी यांना सापडले. या पाकिटामध्ये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे असल्याने घडशी यांनी पाकीट लांजा पोलिस स्थानकात जमा केले.
पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी अक्षय शिंदे यांच्याशी संपर्क साधून ओळख पटवून पाकीट घेऊन जाण्यास सांगितले. प्रामाणिकपणे पाकीट परत करणाऱ्या अनिल घडशी यांच्या हस्ते अक्षय यांना पाकीट परत देण्यात आले. यावेळी नीळकंठ बगळे यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक शिरीषकुमार भोसले उपस्थित होते. हा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल नीळकंठ बगळे यांनी घडशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. अक्षय शिंदे यांनीही त्यांचे विशेष आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 02/Jan/2026














