रत्नागिरी : थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने शहरामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात भीमा कोरेगाव शौर्य दिन अर्थात भीमा कोरेगाव विजयदिन काल (१ जानेवारी) साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर १८ फूट उंच भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रथम थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती ता. जि. रत्नागिरीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीस उपस्थित आणि यांच्या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली, आणि भीमा कोरेगाव युद्ध १८१८ मधील शूरवीर ५०० सैनिकांस अभिवादन करण्यात आले. यावेळी घोषनांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता. विजय स्तंभाला सलामी देताना उपस्थित प्रत्येक समाज बंधुभगिनीत उत्साह संचारला होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असा अभिवादन सोहळा या वर्षीपासून थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीने सुरू करून सामाजिक प्रेरनेचे एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे.
दुपारी १२ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे अभिवादन सभा घेण्यात आली. या अभिवादन सभेमध्ये जेष्ठ प्रबोधनकार, इतिहास संशोधक प्रा. सुहास नाईक (पुणे) यांनी भीमा कोरेगाव युद्धाचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर उभा केला. इतिहासातील अनेक दाखले त्यांनी ५०० शूर वीरांचे शौर्य कथित करताना दिले. त्याचप्रमाणे म्यानमार येथून भारतामध्ये १८८५ साली बंदिवान केलेल्या थिबा राजा यांच्या जागतिक बौद्ध धम्म इतिहास उनरुज्जीवीत करण्यात काय उत्तुंग योगदान होते याचा उहापोह केला आणि थिबा राजा कालीन बुद्ध विहार हे राष्ट्रीय स्मारकांत समाविष्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने इतिहास संशोधक प्रा. सुहास नाईक आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृती ज्यांच्या हस्त कौशल्यातून विनामूल्य साकार झाली त्या मिलिंद कांबळे यांचा सत्कार एल. व्ही. पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
या वेळी संघर्ष समितीचे किशोर पवार, अमोल जाधव, तुषार जाधव, दीपक जाधव, शिवराम कदम, सुनील आंबुलकर, दिवेन कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रदीप पवार, अजित जाधव, रत्नदीप कांबळे, सागर जाधव, जितेंद्र कांबळे, मिलिंद सावंत, विरश्री बेटकर, स्मिता कांबळे, अस्मिता कांबळे, राजन जाधव, बबन कांबळे, मनोहर पवार, राजू जाधव, बी. के. कांबळे, अॅड. प्रवीण कांबळे आदी थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सुनील आंबुलकर यांनी आभार मानले. रत्नागिरीत प्रथमच थिबा राजा यांची जयंती आणि भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा झाल्याने नागरिकांत आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 PM 02/Jan/2026














