संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर मंदिर मार्गावरील धोकादायक व गंजलेले विद्युत पोल ग्रामस्थांच्या मागणीनंतर नुकतेच बदलण्यात आले आहेत. याबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत महावितरणचे विशेष आभार मानले आहेत.
या मार्गावरील चिंचनाका येथील एक विद्युत पोल गंजलेल्या अवस्थेत होता. तो केव्हाही कोसळण्याची भीती ग्रामस्थांमध्ये होती, तसेच पुढे सोमेश्वर मंदिर परिसरातील काही विद्युत खांब धोकादायक स्थितीत उभे होते. हे विद्युत पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून गेली वर्षभर होत होती.
या मंदिरात दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांतील मोठा उत्सव असतो. या कालावधीत वाहनांची मोठी ये-जा सुरु असते. त्यामुळे या वर्षी देखील या विद्युत पोलांची भीती ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून व्यक्त होत होती. या बाबत महावितरणचे कोसुंब शाखेचे स्थानिक कर्मचारी यांच्याशी गावातील काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती दाखवून दिली. त्यानंतर ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन या बाबतची वस्तुस्थिती या कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना कळविली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या उत्सवापूर्वीच येथील धोकादायक विद्युत पोल बदलण्याचे काम व इतर काही तांत्रिक कामे मार्गी लावल्याने महावितरणच्या अधिकारी व स्थानिक कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 03/Jan/2026














