Uday Samant | किसान भवनचा परिसर भविष्यात ज्ञानकेंद्र बनेल : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : राजकारणात अनेक लोक येतात आणि जातात, पण जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. कुणबी समाजाने मला नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानले आहे. या समाजाच्या कष्टावरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या समाजासाठी काहीतरी हक्काचे आणि वैयक्तिक भावनेतून करावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे भविष्यात हा परिसर ज्ञानाचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त करीत आपण म्हणून स्वखर्चातून या किसान भवनची उभारणी केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ, खालगावच्या इतिहासात १ जानेवारी २०२६ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा ठरला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून आणि स्वखर्चातून उभारलेल्या भव्य किसान भवन या वास्तूचा लोकार्पण सोहळा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पार पडला. कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी आणि सामाजिक एकतेसाठी पालकमंत्री सामंत यांनी उचललेले हे पाऊल संपूर्ण जिल्ह्यामध्ये कौतुकाचा विषय ठरले आहे.

या सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत बोलताना ना. सामंत म्हणाले की, कुणबी समाजासाठी काहीतरी हक्काने आणि वैयक्तिक भावनेतून करावे, अशी माझी इच्छा होती. म्हणूनच, या भव्य किसान भावनाची उभारणी मी कोणत्याही शासकीय निधीशिवाय केवळ स्वखर्चातून केली आहे. हे भवन म्हणजे कुणबी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. खालगाव आणि आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग या ठिकाणाहून प्रशस्त होईल. येथे केवळ सभा आणि समारंभ होणार नाहीत, तर हा परिसर ज्ञानाचे केंद्र बनेल. आधुनिक शेतीची तंत्रे, खतांचा वापर, फळबाग लागवड आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती देण्यासाठी येथे नियमित कार्यशाळा आयोजित केल्या जातील. जाकादेवी परिसरातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सोयीसुविधांसाठी मी सदैव तत्पर आहे. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून उभारलेली ही वास्तू आता समाजाच्या ताब्यात असून, तिचे पावित्र्य राखून समाजाच्या हितासाठी तिचा वापर करावा, अशी विनंती त्यांनी केली. अभ्यासिका आणि करिअर कुणबी समाजातील तरुण पिढीसाठी या ठिकाणी अद्ययावत अभ्यासिका आणि करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे. ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून मोठ्या पदांवर जावे, हेच माझे स्वप्न आहे. उद्योगमंत्री म्हणून काम करताना कोकणात नवीन उद्योग येत आहेत, पण या उद्योगांमध्ये आपल्या समाजातील मुले केवळ कामगार म्हणून नाही, तर मालक म्हणून उभी राहिली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला.

यावेळी उपस्थित कुणबी समाज संघाचे मुंबई अध्यक्ष अनिल नवगणे, राजेश बेंडल, रामभाऊ गराटे, माजी मंत्री स्व. ल. रं. हातणकर यांच्या पत्नी श्रीमती सुधाताई हातणकर यांच्यासह समाजासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे वारस संदीप माईंगडे, संजय बैकर, किंजळे, वारिसे, नावले यांचा सत्कार करण्यात आला. आप्पा धनावडे, सरपंच गोताड यांनाही गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कुणबी समाजाचे विविध विभागांतील अध्यक्ष, महिला मंडळ आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने 3 उपस्थित होते.

मंत्री सामंत यांच्या या दातृत्वाचा गौरव !
यावेळी उपस्थित असलेल्या जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ज्येष्ठ ग्रामस्थांनी ना. सामंत यांच्या या दातृत्वाचा गौरव केला. आजवर अनेक नेते पाहिले, पण समाजाच्या वास्तूसाठी स्वतःचा पैसा खर्च करणारा हा पहिला लोकनेता आहे,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 03/Jan/2026