चिपळूण- कराड मार्गावरील सोनपात्रा परिसरात टँकर उलटला

चिपळूण : चिपळूण- कराड राष्ट्रीय मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या भागातील सोनपात्रा परिसरातील अवघड वळण तर मृत्यूचा सापळाच बनले आहे. चढ-उताराच्या या वळणावर मोठ मोठे खड्डे पडले असून दरदिवशी या ठिकाणी मालवाहू ट्रक, कंटेनर व टँकर उलटण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने डोळेझाक केली आहे.

अनेकवेळा अपघात घडून हा मार्ग ठप्प होत असताना अद्याप या ठिकाणचे खड्डे भरले जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी टँकर कलंडल्याने काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

अवजड वाहतूक ठप्प झाली होती तर छोटी वाहने एकेरी मार्गान काढण्यात येत होती. दरम्यान, कुंभार्ली घाटातील वाढत्या अपघातांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनीही या मार्गावर तातडीने योजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही दिला आहे.

मार्ग धोकदायक
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतरही संबंधित विभाग झोपेतच असून प्रवाशांना मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 03/Jan/2026