रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठे खिंडार! मिरजोळे जि.प. गटातील ३ प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शिंदे गटात प्रवेशाची जोरदार चर्चा

◼️ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप; १० ते १५ कार्यकर्त्यांसह पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर?

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच रत्नागिरीत (Ratnagiri) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मिरजोळे जिल्हा परिषद गटात (Mirjole ZP Group) ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षातील ३ सक्रिय आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अचानक आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हे पदाधिकारी लवकरच शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

कोणत्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे?

मिरजोळे जि.प. गटातील ज्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यांची नावे खालीलप्रमाणे: १. वैभव पाटील (विभागप्रमुख) २. डॉ. मयुरेश पाटील (उपविभागप्रमुख) ३. शुभानंद पाटील (विभाग संघटक) या तिघांनीही ठाकरे शिवसेनेतील आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. “सद्यस्थितीत पक्षाचे काम करणे शक्य होत नसल्याने आणि वैयक्तिक कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत आहोत,” असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

शिंदे गटात प्रवेशाची चर्चा

एकीकडे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेची निवडणूकही (ZP Election) तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत वैभव पाटील, डॉ. मयुरेश पाटील आणि शुभानंद पाटील यांसारख्या तगड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणे हा ठाकरे गटासाठी मोठा सेटबॅक मानला जात आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही पदाधिकारी आपल्या सोबत १० ते १५ प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन लवकरच शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) अधिकृत प्रवेश करणार आहेत. स्थानिक पातळीवर उमेदवार मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची ओढाताण सुरू असतानाच शिंदे गटाने ही खेळी खेळून ठाकरे गटाला शह दिल्याचे बोलले जात आहे. या बंडामुळे मिरजोळे गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 03-01-2026