खेड : पुढील काळात महिला शक्तीच आपला देश चालवतील, महिला शक्ती खूप मोठी असते नर्सिंग क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिला नर्सला अधिक महत्त्व आहे. कारण डॉक्टरांपेक्षा रुग्णांबद्दल तिलाच अधिक माहिती असते, असे प्रतिपादन पुणे येथील सिटी कॉर्पोरेशन आणि अमनोरा टाऊनशिपचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे यांनी येथे केले.
घाणेखुंट-लोटे येथील एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आयोजित विद्यार्थी शपथग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देशपांडे यांनी कॉलेजमधील योग्यताधारक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी म्हणून दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली व प्रत्यक्ष त्या रक्कमेचा धनादेश प्राचार्य काळे यांच्याकडे सुपर्द केला.
महाविद्यालयातील योग्य मुलींनाच ही शिष्यवृत्ती दरवर्षी द्यावी असे त्यांनी सूचित केले. एमइएस कॉलेजचे आता काही वर्षात नवीन वास्तूत स्थलांतर करणार आहे. त्याची उभारणी करण्याची जबाबदारी श्री. देशपांडे यांच्यावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सोपवली आहे. काही वर्षात येथील महाविद्यालयाची इमारत संपूर्ण कोकणात पाहण्यासारखी उच्च दर्जाचे असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रा. मेघना गोखले यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 03/Jan/2026









