चिपळुणातील वाशिष्ठी कृषी महोत्सवात ५ जानेवारीपासून होणार शिवशौर्य आठवणी, विठूनामाचा गजर अन् सुरांची बरसात

चिपळूण : सलग तिसऱ्या वर्षी वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित चिपळूणमधील वाशिष्ठी कृषी महोत्सवात यंदाही नवचैतन्य, नवी ऊर्जा आणि अस्सल मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळणार आहे. ५ ते ९ जानेवारी या कालावधीत संगीत, भक्ती, शौर्य, निष्ठा आणि मनोरंजन यांचा सांस्कृतिक नजराणा रसिकांना दररोज रात्री अनुभवता येणार आहे.

या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विघ्नहर्ता ढोलपथक, मुकुंद गुरव तुतारी वादक आणि छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर येथील गणेश कदम यांचा पारंपरिक वाद्यांचा गजर, तुतारीचा नाद आणि मर्दानी खेळांची रोमांचक अनुभूती देणारा ‘पारंपरिक वाद्य व स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा’ हा एकत्रित कार्यक्रम रंगणार आहे.

६ रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ रंगणार आहे. तसेच रात्री ८ वाजता कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘वारी’ हा भक्तिरसाने ओथंबलेला कार्यक्रम रसिकांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणार आहे. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता मांजरप्रेमीसाठी आकर्षण ठरलेल्या कॅट शो, तर सायंकाळी ६ वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच रात्री ८ वा. कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ हा कार्यक्रम होणार आहे. ८ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉग शो होणार असून सायंकाळी ६ वाजता भजनात तल्लीन होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. तसेच रात्री ८ वाजता लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांच्या बहारदार सुरांनी महोत्सव दुमदुमून जाणार आहे.

महोत्सवाचा समारोप ९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता प्रसिद्ध संगीतकार अशोक हांडे यांच्या ‘आवारा हूँ’ या लाईव्ह शोद्वारे होणार आहे. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या संगीतमय जीवनगाथेचे हृदयस्पर्शी सादरीकरण निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या सर्जनशील मांडणीतून रसिकांना अनुभवता येणार असल्याचे वाशिष्ठी डेअरी चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव यांनी कळवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 03/Jan/2026