पुणे : यंदा लक्ष्मीपूजन एक नोव्हेंबर रोजीच आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन ३१ ऑक्टोबरला नाही; तर १ नोव्हेंबरलाच ते साजरे करावे. संभ्रम करून घेऊ नये, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी शनिवारी दिली.
यापूर्वी २८ ऑक्टोबर १९६२, १७ ऑक्टोबर १९६३ आणि २ नोव्हेंबर २०१३ रोजी उदयास असलेल्या अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले होते, असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी तीन ते रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे, असेही त्यांनी नमूद केले. यंदाच्या वर्षी ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन्ही दिवशी अमावास्या आहे. गुरुवारी अमावास्या दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होऊन शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर ६ वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळेच लक्ष्मीपूजन कधी साजरे करायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पण दोन्ही दिवशी अमावास्या असली तरी गुरुवारी नरक चतुर्दशी आहे, तर शुक्रवारी लक्ष्मीपूजन साजरे करावे, असे दाते यांनी सांगितले. दाते म्हणाले, धर्मशास्त्रात एखाद्या व्रताविषयी ३-४ वचने असतात. अशा वेळेस त्यांचा समन्वय करून उत्सवामध्ये एकवाक्यता आणणे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. याच विचाराने ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनीही १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे, असे निवेदन केले आहे, असे दाते यांनी सांगितले.
एक नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून दिवसभर असलेली अमावास्या सूर्यास्त झाल्यावर संपूर्ण भारतात कमी- अधिक काळ आहे. सूर्यास्तानंतर एक घटी अमावास्या असेल तर संदेह नाही, हे वचन केवळ पुष्टीकारक असे आहे. त्यास विशेष असे महत्त्व नसून सूर्यास्तसमयी प्रदोषकाळात स्पर्श असलेली अमावास्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी गौण प्रदोषकाळातसुद्धा असलेल्या तसेच प्रतिपदायुक्त अशा अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे, हे फलदायी असते. मोहन दाते, दाते पंचांगकर्ते
असे आहेत दिवाळीतील सण
यावर्षी रमा एकादशी आणि वसुबारस सोमवारी एकत्र आहेत. धनत्रयोदशी मंगळवारी आहे. नरक चतुर्दशी गुरुवारी, लक्ष्मीपूजन शुक्रवारी, दिवाळी पाडवा शनिवारी आणि भाऊबीज रविवारी याप्रमाणे दिवाळी साजरी करण्यात येणार आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 28/Oct/2024














