रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे कीड व रोगांचा आंबा फळपिकांवर प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याअनुषंगाने कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व आंबा उत्पादक शेतकरी यांच्यासमवेत जिल्ह्यातील पहिला ऑनलाइन वेबिनार ३१ डिसेंबर रोजी पार पडला.
वेबिनारचे अध्यक्षस्थान कोकण विभागाचे (ठाणे) विभागीय कृषी सहसंचालक यांनी भूषवले. यामध्ये संशोधन उपसंचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. जालगावकर, भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कनिष्ठ कीटक शास्रज्ञ डॉ. वानखेडे, कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. मुळे, व वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पोटफोडे आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते.
या ऑनलाईन वेबीनारमध्ये शेतकऱ्यांना आंबा मोहर संरक्षण तसेच आंबा फुलकिड व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी करण्याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्याकडून करण्यात आले.
अशा प्रकारचे वेबिनार जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सांयकाळी ६ वाजता आयोजित केले जाणार आहेत.
या वेबिनारची लिंक (बेबीनार ग्रुप लिंक:-https://chat.whatsapp.com/HFmOKF4AVIDELTvy0i0cH3) व्हॉटसप ग्रुपद्वारे पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी सेवक, सहाय्यक कृषी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 03/Jan/2026














