चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर राजकीय पक्षांनी आपापल्या गटनेत्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दोनच दिवसापूर्वी शिवसेना उबाठा पक्षाकडून मिथिलेश उर्फ विकी नरळकर तर शुक्रवारी भाजपकडून चौथ्यांदा नगरसेवक पदी विराजमान झालेले शशिकांत मोदी तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून अंकुश आवले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मोदी व नरळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव करत विजयी झाले. शिवसेनेचे ९, भाजपचे ७, शिवसेना उबाठा पक्षाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे २ तर काँग्रेसचे ३ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.
शिवसेना-भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ विजयी झाले असल्याने भाजपला नगराध्यक्ष पद मिळणार असल्याने या पदी कोणाची वर्णी लागणार ? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) पक्ष, भाजप, शिवसेना उबाठा या तीन पक्षांनी चिपळूण नगरपरिषदेतील आपापल्या गटनेत्यांची निवडी जाहीर केल्या आहेत यामध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून प्रभाग क्रमांक ११ मधून प्रथमच दणक्यात विजय मिळवलेले अंकुश आवले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या मोदीने शिवसेनेतील फुटी नंतर काही काळ उद्धव ठाकरे गटासोबत राहणे पसंत केले. यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांना चिपळूण शहर प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. हीच गोष्ट पक्षातील काही घटकांना खटकली. मात्र, मोदी यांनी याकडे दुर्लक्ष करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत राहिले. याचेच फलित म्हणून भाजपने चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. तर मोदी यांच्याविरोधात भाजपचेच परिमल भोसले यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, मोदी यांनी तब्बल ८०० हून अधिक मतानी दणदणीत विजय मिळवला. चौथ्यांदा दिमाखात नगरसेवक झालेले शशिकांत मोदी यांची गटनेतेपदी निवड करून भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
शिवसेना शिंदे गट पक्षाकडून चिपून नगरपरिषदेच्या गटनेतेपदी निवड झालेले अंकुश आवले तर भाजपकडून गटनेतेपदी निवड झालेले शशिकांत मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षाच्या वरिष्ठांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावू. चिपळूण शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही या दोघांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 03/Jan/2026














