रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील (Ratnagiri City) वर्दळीच्या राम आळी (Ram Ali) परिसरात आज सकाळी एटीएम सेंटरबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीला उठवताना सुरक्षा रक्षकाने थेट काठीने मारहाण केली. या मारहाणीत काठीचा फटका डोक्यात बसल्याने संबंधित व्यक्तीचे डोके फुटले असून, प्रचंड रक्तस्त्राव झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि राम आळीत खून झाल्याची अफवा सर्वत्र पसरली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (रविवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राम आळी येथे असलेल्या जनता बँकेच्या (Janata Bank ATM) एटीएम सेंटरबाहेर एक व्यक्ती झोपलेली होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही व्यक्ती कालपासून बाजारपेठ परिसरात फिरताना दिसत होती.
आज सकाळी या व्यक्तीला एटीएमबाहेर झोपलेले पाहून सुरक्षा रक्षकाने (Security Guard) हटकले. मात्र, त्यानंतर संतापाच्या भरात रक्षकाने त्याच्या हातातील काठीने या व्यक्तीला मारहाण केली. दुर्दैवाने हा फटका त्या व्यक्तीच्या थेट डोक्यावर बसला. प्रहार इतका जोरात होता की, त्या व्यक्तीचे डोके फुटले आणि जागेवरच रक्ताच्या धारा लागल्या. यामुळे एटीएम बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले.
पोलिसांची धाव आणि उपचार
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) उपचारांसाठी हलवले आहे. सध्या त्या व्यक्तीवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














