राज्य बालनाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाविसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (ता. ५) पासून प्रारंभ होणार आहे.

देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात सकाळी पाऊणेदहा वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालनाट्यांचा समावेश आहे. कोल्हापूर आणि सांगली हे विभागीय केंद्र असून कोल्हापुरातून २६ बालनाट्य आणि सांगलीतून २४ बालनाट्ये अशी एकूण पन्नास बालनाट्ये या प्राथमिक फेरीत सादर होतील. उद्‌घाटन सोहळ्यात बाल रंगभूमीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले रंगकर्मी अविनाश देशमुख आणि संजय तोडकर यांचा सन्मान होणार आहे.

विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच रसिकांना स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश आहे. आजची बालनाट्ये अशी… बालपण हरवले रे देवा (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), झेप (ग्रीन व्हॅली स्कूल, पेठवडगाव), मनातल्या भुतांची ऐशीतैशी (आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ), बीज अंकुरले (कुडाळ हायस्कूल), उंदीर मामाची जादूई दुनिया (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ), पक्ष्यांचे कविसंमेलन (बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 05-01-2026