चिपळूण : चिपळूण येथील उपनगराध्यक्षपदाची निवडणूक १२ जानेवारीला होणार आहे. या पदासाठी युतीच्या कोणत्या नगरसेवकाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षपद शिवसेना आपल्याकडे ठेवणार की भाजपला देणार हे निवडणुकीवेळी स्पष्ट होणार आहे.
चिपळूण पालिकेत शिवसेना-भाजप युतीचे बहुमत आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश सकपाळ यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेकडे ११ नगरसेवक आहेत. भाजपकडे ७ नगरसेवक आहे. शिवसेनेकडे नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सेनेतील काही नगरसेवक उपनगराध्यक्षपद आपल्याला मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपकडून नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग सुरू आहे. भाजपकडे अनुभवी शशिकांत मोदी आणि रसिका देवळेकर यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. शशिकांत मोदी यांची पाच वर्षासाठी पालिकेच्या गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला पालिकेचा कामकाज करताना मोदी यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. ज्या पक्षाला किंवा ज्या नगरसेवकाला हे पद मिळेल ते एक वर्षासाठी असणार आहे. कारण दरवर्षी विषय समिती सभापतिपदाची निवडणूक लागेल त्याचवेळी उपनगराध्यक्षही बदलले जाणार आहे. त्यामुळे भाजपने उपनगराध्यक्षपद घेतले तर महत्वाच्या विषय समित्यांवर शिवसेना दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागेल हे १२ जानेवारीला स्पष्ट होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 05-01-2026














