Chiplun : सती-चिंचघरीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलविली परसबाग

चिपळूण : खेर्डी-चिंचघरी-सती (तालुका चिपळूण) येथील प्राथमिक शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर सुंदर अशी परसबाग फुलली आहे. पर्यावरण संवर्धन व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण या उद्देशाने शाळेत हा परसबाग उपक्रम राबविण्यात आला.

या परसबागेत विद्यार्थ्यांनी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, मेथी, पालक, मुळा, कोबी, कांदापात, झेंडूची फुले व औषधी वनस्पती आदीची लागवड केली. परसबागेत बी पेरणीपासून रोपांची निगा, पाणी देणे, तण काढणे व सेंद्रिय खत देणे अशी सर्व कामे विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली. परसबागेला ठिबक सिंचन केलेले आहे. परिश्रमाचे फळ म्हणून बागेत भरघोस भाजीपाला तयार झाला. विशेष म्हणजे परसबागेतून मिळालेल्या ताज्या व पोषक भाज्यांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.

स्वतः पिकवलेल्या भाजीचा स्वाद घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते. या परसबागेसाठी खेर्डी-चिंचघरी सती येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका रूपाली खरात व शीतल पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत सुंदर अशी परसबाग फुलवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 05/Jan/2026