कोंडगावमध्ये वकिलाच्या बंद घरावर डल्ला; रोख ५ लाखांसह साडेसात लाखांचा ऐवज लंपास

देवरुख/संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील (Sangameshwar Taluka) कोंडगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका वकिलाच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ७ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये ५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचा समावेश आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. सुबोध मोरेश्वर जोगळेकर (वय ५३, व्यवसाय – वकील) हे मूळचे कोंडगाव (केतकर गल्ली, ता. संगमेश्वर) येथील रहिवासी असून सध्या ते कोंढणपूर (ता. हवेली, जि. पुणे) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कोंडगाव येथील घर ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपासून ते ३ जानेवारी २०२६ च्या दुपारी ३.३० वाजेपर्यंत बंद होते.

या कालावधीत अज्ञात चोरट्याने जोगळेकर यांच्या घराच्या मागील दरवाजावर कोणत्यातरी हत्याराने जोराचा फटका मारून आतील कडी तोडली आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील रोकड आणि दागिने चोरले. विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ मौल्यवान वस्तूच नाही, तर घरातील तांब्या-पितळेची भांडी, शेतीची अवजारे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही चोरून नेल्या आहेत.

काय काय चोरीला गेले? (चोरीचा तपशील) चोरट्यांनी एकूण ७,६२,७०० रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे. त्याची यादी खालीलप्रमाणे:

रोख रक्कम: ५,००,०००/- रुपये.

सोने: १५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (७५,००० रु.) आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (१,००,००० रु.).

चांदी: ३०० ग्रॅम वजनाचे ६ चांदीचे गोळे (२०,००० रु.).

पितळ व तांबे: ८ किलो वजनाच्या २ मोठ्या व ४ किलो वजनाच्या २ लहान समई, तांब्याचे तामन, कलश, हंडे, बादल्या असा सुमारे ४०० किलोचा साठा (किंमत सुमारे ६०,००० रु.).

इलेक्ट्रॉनिक: कॉम्प्युटर, प्रिंटर, इन्व्हर्टर, युपीएस बॅटरी, ४ हार्ड डिस्क (किंमत ५०० रु. दर्शविली आहे – जुने असावे).

इतर साहित्य: गॅस सिलिंडर (२ मोठे, २ लहान), गॅस शेगडी, शेतीची अवजारे (कुऱ्हाड, कुदळ, फावडी, कोयते), स्टीलची भांडी इत्यादी.

पोलिस तपास सुरु

याप्रकरणी सुबोध जोगळेकर यांनी ४ जानेवारी २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS 2023) चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे (गु.र.नं. ०३/२०२६). पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 05-01-2026