संगमेश्वरात ग्राफिक डिझाईनिंग, आर्ट रायटिंग, टॅटू मेकिंग कार्यशाळा

देवरुख : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील जाहिरात कला विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी संगमेश्वर येथे एक दिवशीय ग्राफिक डिझाईनिंग, आर्ट रायटिंग व टॅटू मेकिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत ग्राफिक डिझाईनिंग, आर्ट रायटिंग, टॅटू मेकिंग, स्केचिंग, बॉल पेंटिंग, अक्षर गणेश आदी कलाक्षेत्रांतील व्यावसायिक संधी, आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके तसेच करिअर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना ग्राफिक मेकर व टॅटू अँड डिझायनर अमोल नागप म्हणाले की, ग्राफिक्स व टॅटू मेकिंगला जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कला कधीही संपत नाही, संधी मिळाल्यानंतर तिचे सोने करणे आवश्यक आहे. स्केच रेखाटने ही मूळ संकल्पना असून ती ग्राहकांच्या आवडीनुसार विकसित करणे गरजेचे आहे. आजच्या युगात जाहिरातीचे महत्त्व वाढले असून ग्राहकांना हवे ते दिल्यास ते किंमत देण्यास तयार होतात.

ग्राफिक मेकर, टॅटू अँड डिझायनर संदेश वेल्ये यांनी कला ही आपल्या परिस्थितीवर मात करण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. कला कधीही मरत नाही, ती प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. उपलब्ध संधींचा योग्य लाभ घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य संजना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. पदवीधर शिक्षणासोबतच कला कौशल्यांची जोपासना केल्यास विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळते, असे सांगितले. प्रास्ताविक जाहिरात कला विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले, तर सूत्रसंचालन प्रा. प्रशांत जाधव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 05/Jan/2026