खेड/रत्नागिरी : दारूच्या नशेमुळे आणि व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उद्धवस्त होत असल्याचे आपण पाहतो. असाच एक संतापजनक प्रकार खेड (Khed) तालुक्यातील भरणे नाका येथे घडला आहे. पतीला दारू पिण्यासाठी बाहेर जाण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून, पतीने चक्क पीव्हीसी (PVC) पाईपने पत्नीच्या डोक्यात प्रहार करून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला आणि आरोपी वियोग चंद्रकांत पाटणे (रा. भरणेनाका, रुचीरा हॉटेलच्या मागे, ता. खेड) हे पती-पत्नी आहेत.
घटनेच्या दिवशी रात्री आरोपी वियोग हा दारू पिण्यासाठी (Alcohol Addiction) घरातून बाहेर जात होता. यावेळी त्याच्या पत्नीने त्याला अडवले आणि “दारू पिण्यासाठी बाहेर जाऊ नका,” अशी विनंती केली. मात्र, पत्नीने अडवल्याचा वियोगला प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने घरात पडलेला पीव्हीसी पाईप उचलला आणि पत्नीच्या डोक्यात सलग दोन ते तीन वेळा जोरात मारला. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत पुन्हा मारण्याची धमकीही दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून, ४ जानेवारी २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी वियोग चंद्रकांत पाटणे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS 2023) च्या कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), ३५२ (अपमान करणे), ३५२(२) आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे (गु.र.नं. ०२/२०२६). पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 05-01-2026














