पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत रत्नागिरीच्या ‘फिनोलेक्स अॅकॅडमीची’ प्रायोगिक एकांकिका सर्वोत्तम

रत्नागरी : पुरुषोत्तम करंडक ही महाराष्ट्रातील नामांकित व प्रतिष्ठेची एकांकिका स्पर्धा असून, या स्पर्धेच्या पुणे येथे झालेल्या महाअंतिम फेरीत रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने ऐतिहासिक कामगिरी करत ‘सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. यासोबतच या स्पर्धेतील महाअंतिम फेरीची (मेगा फायनल) पहिलीच ट्रॉफी फिनोलेक्स अॅकॅडमीने मिळवली आहे.

विशेष बाब म्हणजे रत्नागरी विभागातील कोणत्याही महाविद्यालयाला आजवर हा करंडक मिळालेला नाही. त्यामुळे फिनोलेक्स अॅकॅडमीने हा सन्मान मिळवून रत्नागिरी केंद्राच्या शरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फिनोलेक्स अॅकॅडमीच्या दोन एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या, ज्यामध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत त्यांनी मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. राज्यभरातील १७ नामांकित महाविद्यालयांमध्ये झालेल्या मेगा फायनल फेरीत फिनोलेक्स अॅकॅडमीने उल्लेखनीय कामगरी केली. संजय पवार, द्रशेखर ढवळीकर, अमित फाळके यांनी परीक्षक म्हणून कामगरी पार पाडली.

मेगा फायनलमध्ये सादर करण्यात आलेल्या ‘ठोग्या’ या एकांकिकेला सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून ‘कुमार जोशी करंडक’ प्रदान करण्यात आला. तसेच ‘तुकारामाची टोपी’ या एकांकिकेमधील प्रभावी भूमिकेसाठी कु. गायत्री शिंदे हिला विशेष अभिनय नैपुण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

एकांकिकेच्या लेखन दिग्दर्शनासाठी यश मोडक, प्रतीक घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एल डी नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी संघाला पाठिंबा दिला. हे यश विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असून, फिनोलेक्स अॅकॅडमीच्या परंपरेत नवा इतिहास जोडणारे ठरले आहे, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 05/Jan/2026