चिपळूण खेरशेत टोलनाका परिसर झाला सुरक्षित

आरवली : चिपळूण तालुक्यातील खेरशेत टोल नाका येथे बसविण्यात आलेले रस्ता दुभाजक अनेकदा वाहन चालकांना समजत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. सदरची गंभीर बाब सावर्डे पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास अनेकदा आली.

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे ही बाब प्रभावीपणे मांडली आणि त्वरित या गंभीर बाबीची दखल घेऊन आबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्गाचे शहाबुद्दीन हे आपल्या टीमसह खेरशेत टोल नाका येथे दाखल झाले. येथे दुभाजक दिसत नसल्यामुळे प्रथमतः दोन्ही बाजूस रेडियम, वळण दाखवणारे सूचना फलक तसेच टोलनाका येण्यापूर्वी काही अंतरावर सूचना आदींसारख्या आवश्यक उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी केली.

याकामी सावर्डे पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनीदेखील महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. यामुळे महामार्गावरती वाहनचालक थेट येऊन येथे धडकण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी अनेक वाहनचालकांनी थांबून आबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्गाचे आभार व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 05/Jan/2026