रत्नागिरी : एसटी महामंडळाने बसस्थाकांवर, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली. नको सुट्टया पैशाची कटकट, तिकीट काढा झटपट अशा प्रकारचे पोस्टर जिल्ह्यासह राज्यभरातील बसस्थानकावर लावून जनजागृती सुरू होती. अखेर जनजागृतीला यश आले आहे. विविध यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्यासाठी सातत्याने वाढ होत आहे. अखेर यूपीआय पेमेंटला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रकमेचा व सुट्ट्या पैसे ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशावरून वाहकांशी होणाऱ्या अनावश्यक वादाला पूर्ण विराम मिळाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असून महामंडळास कोट्यवधीचे उलाढाल झाली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात एसटी महामंडळाच्या वतीने १४.९९ टक्के भाडेवाढ करण्यात आली.
या भाडेवाढीमुळे सुट्ट्या, चिल्लरचा वांदा होऊ लागला. १ रुपये, २ रुपये चिल्लर नसल्यामुळे वाहक, प्रवाशांत वाद होत होते. रत्नागिरीसह राज्यभरात वाद होते. त्यामुळे महामंडळाच्या वतीने तिकीट काढण्यासाठी डिजिटल स्कॅनर मशिनमध्ये बसवण्यात आले. तसेच डिजिटल व्यवहार सुरू केले. तसेच सर्व बसस्थानकावर यूपीआय पेमेंट करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कमी प्रतिसाद मिळाला, त्यानंतर आता यूपीआय पेमेंटला चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात यूपीआय पेमेंटमधून राज्यात कोट्यवधीचे उलाढाल झाले आहे. रत्नागिरी विभागात ही फोन पे, गुगल पे तसेच विविध अॅपचा वापर करून एसटी तिकीट काढण्यात येत आहे. यूपीआय पेमेंटमधून रत्नागिरी विभागास ही लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर यूपीआय पेमेंटमधून सर्वाधिक महसूल राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यात सुमारे ४९.७९ लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून ६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, ऑक्टोबर महिन्यात ७७. ३२ कोटी, नोव्हेंबर महिन्यात ७८.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला डिसेंबर महिन्यात ६२.५९ लाखांहून अधिक यूपीआय तिकीट काढले, त्यातून ८३.६७ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 05/Jan/2026














