कोकणावर आतापर्यंत प्रशासनाकडून अन्याय : संजय यादवराव

लांजा : कोकणावर एकप्रकारे अन्याय करण्याचे काम आजपर्यंत झाले आहे. कोकणावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायमच लढत राहणार आहे, असे शिवस्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांनी लांजा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, कोकण विकासाबाबत प्रशासनाची अनास्था आहे. येथील विकास झपाट्याने होणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील स्थानिक शेती आंबा, काजू बागायती, पर्यटन, मत्स्योद्योग त्यावरील प्रक्रिया उद्योग, कोकणात गावागावांत ग्रामउद्योग उभारण्यासाठी प्रत्येक गावात शिवस्वराज समिती गठीत करण्याची संकल्प आम्ही केला आहे. येथील बेरोजगारी, कोकण पर्यटन आणि स्थानिक शैली यावरती लक्ष केंद्रित करून येथील शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, स्थानिक जनतेच्या बाजूने उभे राहण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. एकंदरीत कोकणात लोक चळवळ उभी करणार आहोत. त्यासाठी विधानसभा निवडणूक लढवणे गरजेचे आहे. त्यात विजय-पराजय हा महत्त्वाचा नाही. मात्र, शिवस्वराज्यच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून जनतेच्या न्यायासाठी लढत राहणार आहे. माकडांवर नियंत्रण ठेवणे, आंबा बागायतदार व मच्छीमार यांना कर्जमाफी, काजू बी व सुपारी हमीभाव, राज्याचा ४० टक्के निधी देणाऱ्या कोकणाला विकास निधीत वाटा, उद्योग कर्ज व अनुदान आदींसाठी आपला लढा कायम राहील. कुणीही लक्ष देत नसल्यामुळे राजापूर मतदारसंघातून आपण रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 28/Oct/2024