रत्नागिरी : मिऱ्या एमआयडीसी होणार नसल्याचे व प्रकल्प रद्द झाल्याचे पत्र एमआयडीसी कडून ग्रामस्थांना देण्यात आलंय. त्यामुळे आता मिऱ्या एमआयडीसी होणार नाही आहे, ग्रामस्थांना कुणी नाहक राजकारणात ओढू नये आणि गैरसमज पसरवू नये, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
मिऱ्या येथील ग्रामस्थांचा येथील प्रकल्पाला विरोध असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा प्रकल्प आता रद्द करण्यात आला आहे. एमआयडीसी कडून तसे पत्र देखील ११ ऑक्टोबर रोजी देण्यात आले असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
काल पुन्हा एकदा मिऱ्या येथील नागरिकांनी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध केला होता. सदरचा प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना काढा असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. अलावा येथील चौकात येथील ग्रामस्थांची बैठक पार पडली. प्रकल्पाचे पत्र आचारसंहितेपूर्वी काढलेले असताना ते आचारसंहिता जाहीर झाल्यावर बाहेर काढणारे राजकारण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. राज्य सरकारने अधिसूचना काढून जाहीर केलेला प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार प्रादेशिक अधिकाऱ्यांना आहे काय ? असा प्रश्न देखील ग्रामस्थांनी विचारला आहे. मात्र ग्रामस्थांना नाहक राजकारणात ओढले जातंय, ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा प्रकल्प रद्द करण्यात आलाय व तसे पत्र एमआयडीसी कडून काढण्यात आलंय असं आता उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आलंय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 28-10-2024














