Laxman Hake: सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री दिसतील – लक्ष्मण हाके

पुणे: राज्यातील निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) केंद्रात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) राज्यात मंत्री दिसतील.

पुण्यात अजित पवार वरचढ ठरतील. पहाटे फिरून मोकळे भूखंड पुन्हा हडप करतील, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Supriya Sule) यांनी पवार कुटुंबावर तोफ डागली आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक संपल्यानंतर सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात तर रोहित पवार हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असतील. दोन्ही पवार कधीच वेगळे नव्हते हे माझे सांगणे राज्याला दिसून येईल, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

पुण्यात, मुखी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव आणि तिकीट बोडके, आंदेकर, नायर यांना देणाऱ्या अजित पवारांची बाजू सध्या वरचढ असल्याचा अंदाजही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पुण्यात सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार पहाटे बाहेर पडतील मोकळे भूखंड शोधतील आणि पाचशे रुपयात बळकावतील असा गंभीर आरोपही हाके यांनी केला आहे. यावेळी पवार कुटुंबावर तोफ डागताना पवार यांना सर्वसामान्य जनतेचे काही पडले नसून ते अदानीसारख्या उद्योगपतींप्रमाणे उद्योजक असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. जरी शरद पवार भाजपसोबत जायचे नसल्याबाबत वक्तव्य करीत असले तरी त्यांचे खायचे दात वेगळे आणि पोटातले दात वेगळे आहेत. ते राज्यातील भाजपला किंमतच देत नाहीत. तर थेट मोदी आणि शाह यांच्या संपर्कात असतात असा टोला लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांना लगावला आहे.

अजित पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून भाजप स्वतःला पवित्र गंगा मानत असली तरी त्यामध्ये ही भ्रष्ट गटारगंगा मिसळून घेतल्याने सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता ही पक्षावर नाराज असल्याचे हाके यांनी सांगितले आहे. या पवारांना दूर ठेवण्यासाठी जनतेने भाजपला सत्तेवर बसवले आणि पुन्हा भाजपने याच भ्रष्ट पवारांना सत्तेत सहभागी करून घेतले अशी टीका हाके यांनी केली. सध्या राज्यात सर्वच पक्ष एकत्र निवडणूक लढत असल्याचे चित्र असून भाजपची शिंदेसेनेची युती, भाजपची अजित पवारांसोबत युती, अजित पवारांची शरद पवारांसोबत युती, शरद पवारांची काँग्रेस आणि ठाकरे सेनेबरोबर युती, ठाकरे सेनेची मनसे सोबत युती आणि पुन्हा काँग्रेसची वंचित सोबत होती हे पाहता सर्वच पक्ष एकत्रित निवडणूक लढवेत असून याशिवाय आता कोणता पक्ष उरला आहे असा खोचक सवाल हाके यांनी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा बाजूला पडला असून या महापालिका निवडणुकीत सत्ता पैसा आणि गुंडगिरी याच्या जीवावर नगरसेवक निवडून येतील अशी टीका त्यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 07-01-2026