Tilak Varma : तिलक वर्मा अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल

Tilak Varma Injured India vs New Zealand T20I Series : भारतीय स्टार क्रिकेटपटू तिलक वर्मा यांच्याबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, आज सकाळी तिलक वर्माला अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या.

त्यामुळे कोणताही विलंब न करता त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. ही मालिका 21 जानेवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. तिलकच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात सामावून घेण्याचा प्रयत्न बीसीसीआय करणार असला, तरी कर्णधार शुभमन गिलचा विचार होण्याची शक्यता असल्याचे समजते.

राजकोटमध्ये अचानक तब्येत बिघडली

तिलक सध्या राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळत होता. बुधवारी सकाळी नाश्त्यानंतर त्याला अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याने बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मधील डॉक्टरांशी सल्लामसलत केली. बीसीसीआयच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले, ‘तिलकला आज सकाळी पोटात प्रचंड वेदना झाल्या. त्याला तातडीने राजकोटमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे विविध तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल COE च्या डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आहेत.’

डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा दिला सल्ला

सूत्रानुसार, डॉक्टरांनी तिलकला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला असून, त्यातून पूर्णपणे सावरण्यास तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची संपूर्ण टी20 मालिका खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. बीसीसीआयची खरी चिंता मात्र 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी तिलकची उपलब्धता आहे. भारताचा पहिला सामना त्याच दिवशी अमेरिकेविरुद्ध होणार आहे.

शुभमन गिलची टी20 संघात पुनरागमनाची शक्यता नाही

तिलकच्या रिप्लेसमेंटसाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शुभमन गिलला यापूर्वीच टी20 मालिका आणि वर्ल्ड कपसाठी वगळण्यात आले होते आणि निवड समिती तसेच टीम मॅनेजमेंट त्यांच्या पुनरागमनाच्या बाजूने नाही, अशी माहिती आहे. कसोटी आणि वनडेचा कर्णधार असलेल्या गिलला बेंचवर बसवणे किंवा ड्रिंक्स आणण्याचे काम देणे योग्य ठरणार नाही, असा यामागचा युक्तिवाद आहे. शिवाय, तिलक लवकर बरा झाला आणि मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात संघात परतला, तर त्याला पुन्हा वगळणेही विचित्र ठरेल. आसामचा रियान पराग हा एक पर्याय असू शकतो.

श्रेयस अय्यरला फिटनेस क्लिअरन्स

वनडे संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला COE च्या मेडिकल टीमने ‘मॅच फिट’ घोषित केले आहे. त्याने जयपूरमध्ये विजय हजारे ट्रॉफीतील एका साखळी सामन्यात मुंबईकडून खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध 53 चेंडूमध्ये 82 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या प्लीहेच्या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असून, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती.

यशस्वी जैस्वालबाबत अपडेट

मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघात करण्यात आली आहे. COE कडून फिटनेस क्लिअरन्स मिळाल्यानंतर तो संघात दाखल होणार आहे. ऑगस्टमध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यानंतरचा हा त्याचा पहिला वनडे सामना असेल. विजय हजारे ट्रॉफीतील शेवटचा साखळी सामना सोडून तो वडोदऱ्यात भारतीय संघात सहभागी होणार आहे.

हार्दिक पांड्या शेवटचा साखळी सामना खेळणार

हार्दिक पांड्या गुरुवारी चंदीगडविरुद्ध बडोद्याचा शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. विदर्भविरुद्ध त्याने नुकतीच 133 धावांची शानदार खेळी केली होती. वर्कलोड मॅनेजमेंट आणि वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त ठेवण्याच्या उद्देशाने त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. COE ने त्याला एका सामन्यात 10 ओव्हर्स गोलंदाजी करण्यासही मर्यादा घातली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 08-01-2026