Ratnagiri: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ११ लाख ७३ हजार मतदारांची नोंद 

रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे.

त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. जिल्हा निवडणूक विभागानेदेखील आपली तयारी केली असून, २०२५-२६च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुधारित मतदार संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार असून, यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायती निवडणुका झाल्यानंतर लगेचच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा राज्यात धुरळा उडत आहे. १५ जानेवारीला यासाठी मतदान होणार असून, १६ला लगेच निकाल आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक राज्य निवडणूक आयोग कधीही जाहीर करू शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महानगरपालिकांच्या निकालापूर्वी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार की, निकाल झाल्यानंतर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; परंतु पालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-भाजप हे महायुती म्हणून जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जाणार, हे निश्चित आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका काय राहणार, हे पाहावे लागणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण पुरुष मतदार ५ लाख ६५ हजार ७७९ एवढे आहेत तर एकूण महिला मतदार ६ लाख ८ हजार ११० असून, इतर १० मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात असे एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार आहेत. मतदारसंख्येच्या बाबतीत रत्नागिरी तालुका हा सर्वांत जास्त २ लाख ४ हजार ४९३ मतदार आहेत तर सर्वांत कमी मतदान असलेला मंडणगड तालुका असून, तेथे ५५ हजार १११ मतदारांची नोंद आहे. सर्वच तालुक्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. जे मतदान निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू शकते.

तालुक्याचे नाव एकूण मतदार संख्या
रत्नागिरी* २ लाख ४ हजार ४९३
चिपळूण* १ लाख ८३ हजार ६७३
संगमेश्वर* १ लाख ५९ हजार ७१३
दापोली* १ लाख ४० हजार ५५८
खेड* १ लाख ३८ हजार ९२४
राजापूर* १ लाख २० हजार ७०४
गुहागर* ९६ हजार ८३२
लांजा* ७३ हजार ८९१
मंडणगड* ५५ हजार १११

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 08-01-2026