WPL 2026 News : वुमन्स प्रीमियर लीग 2026 चा आजपासून थरार!

WPL 2026 MI vs RCB Live Streaming : वुमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 चा थरार शुक्रवार 9 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तब्बल 28 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवले जाणार असून, 5 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे.

यंदाच्या हंगामातही पाच संघ आपले आव्हान सादर करणार आहेत.

दोन वेन्यूवर रंगणार WPL चा थरार

WPL 2026 चे सामने दोन वेन्यूवर खेळवले जाणार आहेत. पहिला टप्पा 9 ते 17 जानेवारी दरम्यान नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम असणार आहे, तर दुसरा टप्पा 19 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वडोदरा येथे सर्व सामने होतील. आतापर्यंत WPL चे तीन हंगाम खेळवले गेले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सने दोन वेळा, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने एकदा विजेतेपद पटकावले आहे.

पहिला सामना कधी आणि कुठे?

WPL 2026 मधील पहिला हाय-व्होल्टेज सामना शुक्रवार, 9 जानेवारी रोजी खेळवला जाईल. जो डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, नवी मुंबई येथे खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल. स्टार खेळाडूंनी सजलेल्या दोन्ही संघांमुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सकडे साऱ्यांच्या नजरा

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा दमदार कामगिरीसाठी मैदानात उतरणार आहे. संघाकडे नॅट सायवर-ब्रंट, हेले मॅथ्यूज, अमेलिया केर आणि शबनीम इस्माईल यांसारख्या अनुभवी परदेशी खेळाडूंची फौज आहे. WPL मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेली मुंबई इंडियन्स यंदा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने खेळणार आहे.

नव्या जोशात पुनरागमनासाठी आरसीबी सज्ज

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) मागील हंगामातील निराशा विसरून नव्या उमेदीने मैदानात उतरणार आहे. संघात ऋचा घोष, श्रेयंका पाटील, हॅरिस, लॉरेन बेल, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी यांसारख्या खेळाडूंवर मोठ्या अपेक्षा असतील.

सामने थेट कुठे पाहता येणार?

WPL 2026 चे सर्व सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. मोबाइल व ऑनलाइन प्रेक्षकांसाठी सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 09-01-2026