चिपळूणमध्ये रंगणार देशातील पहिले ‘ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन’; १४ व १५ फेब्रुवारीला साहित्य आणि शेतीचा अनोखा संगम!

उद्घाटनाला शरद पवार, एकनाथ शिंदे तर समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती; डॉ. तानाजीराव चोरगे असणार संमेलनाध्यक्ष

चिपळूण/रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत आणि साहित्याच्या विश्वात एक नवा इतिहास घडणार आहे. शेती, ग्रामीण जीवन आणि सहकार या तीनही क्षेत्रांना एका धाग्यात गुंफणारे ‘ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६’ (Gramin, Krushi va Sahakar Marathi Sahitya Sammelan 2026) येत्या १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच संमेलन असून, या सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते आणि साहित्यिक एकाच मंचावर येणार आहेत.

नेमके आयोजन कुठे?

चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या भव्य संकुलात हे दोन दिवशीय संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय जी. भावे जबाबदारी सांभाळणार आहेत.

दिग्गजांची मांदियाळी: शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

या ऐतिहासिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे आणि उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलनाचा समारोप राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याशिवाय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

डॉ. तानाजीराव चोरगे: बहुआयामी संमेलनाध्यक्ष

या पहिल्यावहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे (Dr. Tanajirao Chorge) भूषवणार आहेत. डॉ. चोरगे यांनी कृषी, सहकार आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे. त्यांनी जवळपास ५० पुस्तके लिहिली असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी बँकेचा ‘एनपीए’ (NPA) शून्य टक्के राखत बँकेला शिखरावर नेले आहे.

संमेलनाचा उद्देश काय?

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा म्हणजे शेती आणि ग्रामीण जीवन. यावर आधारित विपुल साहित्य निर्माण झाले आहे. संतांच्या अभंगांपासून ते आधुनिक कृषी तंत्रज्ञानापर्यंतचे साहित्य, तसेच ‘विना सहकार नही उद्धार’ हे तत्त्व रुजवणारे सहकार साहित्य सामान्य माणसापर्यंत पोहोचावे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

संयोजन समिती या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी एक जंबो समिती गठीत करण्यात आली आहे:

  • अध्यक्ष: श्री. प्रकाश देशपांडे
  • प्रमुख कार्यवाह: डॉ. निखिल चोरगे
  • उपाध्यक्ष: बाबाजीराव जाधव, अरुण इंगवले, दीपक पटवर्धन, जयवंतराव जालगांवकर, गजानन पाटील, संदीप राजपुरे .
  • कोषाध्यक्ष: अजय चव्हाण.

रत्नागिरी आणि चिपळूणकरांसाठी ही एक मोठी पर्वणी असून, हजारो शेतकरी आणि साहित्यप्रेमींनी या संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष अरुण इंगवले आणि संयोजन समितीने केले आहे.