◼️ धाराशिव, जालना, सांगली विजयी
रत्नागिरी : धाराशिव येथे सुरु असलेल्या सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. तसेच सोलापूरनेही चांगली कामगिरी केली.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्यावतीने ही स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर होणार आहे. रविवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने एकतर्फी झाले. सोलापूरच्या मुलांनी जालन्यावर २१-८ व मुलीनी बीडवर १७-५ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. नाशिकच्या मुलांनी हिंगोलीला २६-४ तर मुलींनी नंदुरबारला २०-४ असे एका डावाने नमवले.
रत्नागिरीच्या मुलांनी लातूरचा १७-७ व मुलींनी नांदेडचा १९-६ असा एक डावाने धुव्वा उडवला. मुलींच्या गटात धाराशिव, जालना व मुलांच्या गटात सांगली, बीड यांनीही प्रतिस्पर्धी संघावर शानदार विजय मिळविले. मुलींच्या गटात रत्नागिरीच्या संघाने पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यात दिव्या पाल्येने ५ खेळाडू बाद केले. मृण्मयी नागवेकर ४.१५, साक्षी लिंगायत १.५०, आर्या डोर्लेकर आणि रिद्धी चव्हाण यांनी चांगला खेळ केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 28-10-2024