Ratnagiri : जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र शासन शिक्षण मंत्रालय अंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या वतीने ११ जानेवारीपर्यंत इयत्ता ६वी ते १२वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार क्यूआर कोड स्कॅन करून इयत्ता ६वी ते १२वी चे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि पालक यांनी याचा वापर करून ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावयाचा आहे. या उपक्रमामध्ये सहभागी धारकांमधून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड झाल्यास “परीक्षा पे चर्चा’ मोहिमेमध्ये प्रधानमंत्री यांच्या बरोबर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील शाळा किंवा संस्थानी स्वतःच्या समाज माध्यम अकाऊंटवरून २०२६ या नावाने स्वतः तयार केलेले पोस्टर किंवा व्हिडीओ प्रसारित करावे. निवडण्यात आलेले उत्कृष्ट व्हिडीओ प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सदर परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील इयत्ता ६वी ते १२वीमधील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी सहभागी होण्याची अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 10/Jan/2026