Guhagar : पालशेत-वेळणेश्वर भागातील रस्ता खड्डेमय

गुहागर : पर्यटन, व्यापार आणि जलमार्गान रत्नागिरीला जोडणारा सागरी महामार्ग म्हणून ओळखला जाणारा पालशेत-अडूर-वेळणेश्वर-हेदवी-तवसाळ हा महत्त्वाचा मार्ग सध्या पूर्णतः खड्डेमय झाला आहे. खड्डेमुक्त, सुरक्षित, नीटनेटके आणि वाहनसुलभ रस्ते हा काही ऐच्छिक विकास नव्हे, तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत हमी दिलेला जीवनाचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार पायदळी तुडविण्यात येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वेळणेश्वर, हेदवी व तवसाळ येथून पुढे जलमार्गाने रत्नागिरीला जोडणारा हा रस्ता विकासाचा कणा मानला जातो. मात्र आज या रस्त्यावर जागोजागी पडलेले खोल खड्डे, उखडलेले डांबर आणि खचलेले कडे पाहता सागरी महामार्गाचा दर्जा कुठे गेला? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

विशेषतः पालशेत, अडूर आणि वेळणेश्वर या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वरचेवर दुरुस्ती व देखभाल करावी लागत असून सर्वसामान्य वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. सस्पेन्शन, टायर, रिम, चाक, स्टेअरिंग यांचे नुकसान नित्याचेच होऊन बसले आहे.

या परिस्थितीमुळे वाहनचालकांचे आर्थिक नुकसान, शारीरिक त्रास आणि मानसिक तणाव कमालीचा वाढला आहे हा रस्ता वापरणे म्हणजे रोज पैसे, आरोग्य आणि मानसिक शांतता गमावणे आहे, अशी प्रतिक्रिया संतप्त वाहनचालकांतून व्यक्त करण्यात येत आहेत.पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी भयावह होते. पाण्याखाली लपलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक व रुग्णवाहिका सर्वच धोक्यात सापडत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत बसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 10/Jan/2026