Ratnagiri : उदय बने ३० तारखेला भूमिका स्पष्ट करणार..

रत्नागिरी : शिवसेना ‘उबाठा’चे निष्ठावंत आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उदय बने यांना डावलण्यात आल्यानंतर अजूनही त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे राजकीय वादळापूर्वीची ही शांतता असल्याची चर्चा असून, ४० वर्षे निष्ठा ठेऊनही पक्षाने उमेदवारी देतो, देतो म्हणत आयत्यावेळी नाकारली. पक्षश्रेष्ठींची ही भूमिका त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे अनेक निष्ठावंतांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यास सुरुवात केली आहे. आता नाराज बने ३० तारखेला भूमिका स्पष्ट करीत धमाका करणार असल्याची चर्चा असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रत्नागिरी तालुक्यात शिवसेना रुजविणाऱ्यापैकी एक म्हणून उदय बने यांच्याकडे पाहिले जाते. प्रत्येकवेळी पदे देताना अन्यायाचाच सामना त्यांना करावा लागला. सेनेत अनेक बदल झाले. परंतु, उदय बने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक राहिले. त्यामुळे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु पक्षात त्यांच्यावर वारंवार अन्याय झाला. अनेक वेळा त्यांना पक्षाने पद दिली. परंतु, ती औटघटकेची ठरली. त्यांनी यामध्ये कोणताही अपमान न मानता पक्षादेश समजून पक्षासाठी काम करत राहिले.

उदय बने यांनी काम करत असताना ग्रामीण भागात पक्षाची मजबूत बांधणी केली आहे. तालुक्यात आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ५ जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहुन निवडून आले आहेत. मंत्री उदय सामंत यांचे होमपिच असलेल्या पाली गटातून देखील ते निवडून आले होते. मतांची गोळाबेरीज आणि त्याबाबतचा त्यांचा तगडा अभ्यास आहे.

शिवसेना पक्षाचे कोणतेही पद नसताना तालुका कार्यकारिणीने त्यांना आमदारकीच्या उमेदवारीसाठी सक्षम पर्याय समजला यातच त्यांनी सर्व कमावले. ४० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावंताला यावेळी संधी मिळणार याची सर्वांना खात्री होती. कारण आतापर्यंत निष्ठावंत शिवसैनिकाला कधी उमेदवारी मिळालीच नाही. यामुळे श्री. बने हे दुखावले गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:19 28-10-2024