गावात डिजिटल पशुधन अभियान अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

रत्नागिरी : पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत पशुवैद्यकीय चिकित्सालयांमधील पशुधन पर्यवेक्षकांना ते कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावासाठी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. संबंधित गावातील पशुधनाची जन्म, मृत्यू, खरेदी-विक्री, यामुळे पशुधनाच्या संख्येत होणारा बदल व आजार याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहणार आहे. या पशुसंवर्धन विभागाद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरणांचा समावेश आहे.

राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री आदी सर्व नोंदी घेतल्यामुळे वास्तव कालीन माहिती तयार होणार आहे. सदर माहितीचा उपयोग रोग प्रादुर्भावामध्ये रोग नियंत्रण, लस वितरण शीत साखळी व्यवस्थापन आणि लसीकरण मोहिमेच्या अचूक नियोजनासाठी होणार आहे.

अभियानाची पोर्टलवर त्वरित नोंद करणे आवश्यक
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व पशुधन आणि पशुधन मालकांचा आधार आणि मोबाइल क्रमांक, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पशुधनाच्च्या. संख्येत होणारे सर्व बदल (जन्म, मृत्यू खरेदी-विक्री आदी), सांसर्गिक आजारांची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची पोर्टलवर त्वरित नोंद करणे, अशा जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 10/Jan/2026