चिपळूण नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यांसाठी आज निवड प्रक्रिया

चिपळूण : चिपळूण नगर परिषद स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया सोमवारी होणार असून, एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात चिपळूण न.प.त तीन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. या पैकी दोन सदस्य सत्ताधारी तर एक सदस्यपद विरोधी गटाला संख्येच्या प्रमाणानुसार मिळणार आहे. दुपारच्या सुमारास ही निवड जाहीर केली जाणार आहे.

चार वर्षे प्रशासकीय कारभार होता. आता पुढील पाच वर्षे लोकप्रतिनिर्धीच्या हातात कारभार राहणार आहे. चिपळूण नगर परिषदेत सध्या १४ प्रभागातून २८ सदस्य व थेट जनतेमधून नगराध्यक्ष असे २९ सदस्य आहेत. स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेनुसार सदस्य संख्येच्या टक्केवारीत स्वीकृत सदस्य निवड केली जाते. प्रामुख्याने समाजातील राजकीय वर्तुळाच्या व्यतिरिक्त विविध सामाजिक संस्था, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय अशा संस्था व विभागात काम करणाऱ्यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्तीचा मान दिला जातो.

निवडीसाठी पात्र ठरलेला सदस्य हा शहरातील कोणत्याही एका सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक अथवा सेवाभावी संस्थेचा पदाधिकारी किंवा सदस्य असावा, तसेच ही संस्था नोंदणीकृत असावी असे संकेत आहेत. त्यानुसार चिपळूण न.प. मध्ये तीन स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया दि. १२ रोजी दोन सत्रात होत आहे. सांस्कृतीक केंद्रामध्ये ही प्रक्रिया होणार असून पहिल्या टप्प्यात नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, त्यानंतर अर्जाची छाननी, अर्ज मागे घेणे अशा तीन टप्प्यात प्रक्रिया होणार आहे. दुपारच्या सत्रात निवड प्रक्रिया होऊन निवड झालेल्यांची नावे घोषीत केली जाणार आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून दोन तर विरोधी उबाठा सेना गटाकडून एक सदस्य संख्याबळानुसार नामनिर्देशित केला जाणार आहे. त्यामध्ये शिंदे शिवसेनेकडून विकी लवेकर, भाजपकडून माजी महिला शहर अध्यक्षा शीतल रानडे तर उबाठा सेनेकडून माजी नगरसेवक फैसल कास्कर यांना स्वीकृतसाठी नामनिर्देशित केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 12/Jan/2026