चिपळूण : चिपळूण तालुक्यातील केतकी-करंबवणे खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने खाडीत धाड टाकत दोन सक्शन पंप जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
केतकी-करंबवणे खाडीत दोन ते तीन महिन्यांपूर्वी शासनाकडून ड्रेझरच्या माध्यमातून वाळू उपशासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली होती. मात्र, या खाडीत हातपाटी तसेच सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास मनाई आहे. असे असतानाही गेल्या रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत सक्शन पंपांच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. या अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचा आरोप होत होता. महसूल विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने केतकी व करंबवणे खाडीत धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान दोन ठिकाणी बेवारस अवस्थेत सक्शन पंप आढळून आले. हे पंप नेमके कोणाचे आहेत, याचा तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले सक्शन पंप महसूल विभागाच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई: तहसीलदार प्रवीण लोकरे
याबाबत बोलताना तहसीलदार प्रविण लोकरे यांनी सांगितले की, अवैध वाळू उत्खननाचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जात नाही. यापुढेही खाडीत सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा आढळून आल्यास ते तत्काळ जप्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 12/Jan/2026














