Pramod Jadhav Satara: ह्रदयद्रावक! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात जवानाचा मृत्यू; अंत्यदर्शनासाठी नवजात बालक आणि स्ट्रेचरवरून आलेल्या पत्नीला पाहून महाराष्ट्र स्तब्ध!

Pramod Jadhav Satara सातारा: सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सातारा तालुक्यातील दरे या गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव असे जवानाचे नाव असून त्याच्या पश्चात वडील त्यांची पत्नी आणि नवजात बालक (मुलगी) असा परिवार आहे.

वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते मागील आठ दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते यादरम्यान काही कामानिमित्त वाढे फाटा येथे दुचाकीवर जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेनंतर दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली.

काल सकाळी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. या दरम्यानच त्यांच्या पत्नीने लहान मुलीला जन्म दिला.

वीर जवान प्रमोद यांची अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वीर जवान प्रमोद यांची पत्नी आणि लहान बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंतदर्शनासाठी आणण्यात आले. हा क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

काल दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय ईतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 12-01-2026