रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्ते, गटारे, फुटपाथवरील टपऱ्या, दुकाने, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्याची पूर्वतयारी रत्नागिरी नगर परिषदेने सुरु केली आहे. अतिक्रमणे करणाऱ्यांनी त्यांची दुकाने, टपऱ्या, शेड स्वतःहून काढून घेण्याची नोटीस नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे. ही अतिक्रमण हटाव मोहिम कोकणनगर येथून सुरु करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. कोकणनगर जवळच्या परिसरात विमानतळ, तटरक्षक दल, मिरजोळे एमआयडीसी आहे. लवकरच विमानतळ सेवेत रुजू होण्याच्या मार्गावर आहे. एमआयडीसीमधील उद्योगही वाढू लागले आहेत. विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या वीजपुरवठ्यासंदर्भात आवश्यक असणारी वीज वाहिनी जमीनीखालून टाकायची आहे. परंतू कोकणनगर येथील रस्त्यांच्या साईडपटटयांमध्ये शेकडो बेकायदेशीर दुकाने आणि टपऱ्या उभारलेल्या आहेत. त्यामुळे येथील दृश्य फारच बकाल झालेले आहे. विमानतळ प्राधिकरणाने नगरपरिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष वेधले आहे. यासह इतर कारणांमुळे रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात कोकणनगर येथूनच होणार आहे.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि फळविक्रेत्यांच्या टपऱ्या आहेत. गटारांवर दुकाने, खोके उभारण्यात आल्या आहेत. अनेक इमारतीतील दुकानदारांनी सोडलेल्या सामासिक अंतरात पत्रयाच्या शेड काढल्या आहेत. या शेडमध्ये दुकानातील सामान ठेवले जाते. काहींनी तर या शेडमध्ये भाडयाने दुकाने चालवण्यास दिली आहेत. ही सर्व अतिक्रमणे किंवा अडथळे १७जानेवारीपर्यंत दुकानदारांनी, टपऱ्याधारकांनी स्वतःहून काढून घेण्यास प्रसिद्ध केलेल्या नोटीसमधून कळवले आहे. अशा प्रकारे अतिक्रमण मोहिमेची पूर्वतयारी सुरु झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 12/Jan/2026














