रत्नागिरी : कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या रत्नागिरी नगरीत लवकरच एक ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे. जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे २२ जानेवारी रोजी रत्नागिरीत आगमन होत आहे. या खास भेटीच्या निमित्ताने शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर सायंकाळी ५ वाजता भव्य भक्ती उत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका जया सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून भारतीय संस्कृतीतील योग, ध्यान आणि प्राणायाम या मूल्यांचा प्रचार करून जगभरातील मानवाला तणावमुक्त आणि निर्भय बनवण्याचे कार्य केले आहे. विशेषतः त्यांच्या सुदर्शन क्रिया या क्रांतिकारी शोधामुळे जगातील १८० देशांमधील कोट्यवधी लोकांच्या जीवनात हास्य आणि आनंद परतला आहे. केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर जागतिक शांततेचे दूत म्हणून त्यांनी अनेक देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि संघर्षाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राममंदिरासारख्या जटिल प्रश्नांतही त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पाऊल रत्नागिरीच्या भूमीला लागणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. हा भक्ती उत्सव म्हणजे केवळ एक व्याख्यान नसून, तो ज्ञान, ध्यान आणि सुश्राव्य भजन-सत्संगाचा एक अनोखा त्रिवेणी संगम असणार आहे. प्रत्यक्ष गुरुदेवांच्या उपस्थितीत सामूहिक ध्यान करण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार असून, हा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा देणारा ठरेल असे पत्रकार परिषदेत बोलताना जया सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भूमी आहे. गुरुदेवांच्या आगमनामुळे या भूमीच्या आध्यात्मिक महत्त्वामध्ये मोलाची भर पडणार आहे. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची मोठी टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. यावेळी जया सामंत यांच्यासह विनीता गोखले, भुवना महागावकर, प्राची देशपांडे, प्राची जोशी, राजेश भुर्के, नीलेश मिरजकर, प्रवीण डोंगरे, श्वेता भट आणि ओंकार फडके आदी उपस्थिती होते.
या भूमीत ‘न भूतो न भविष्यती’ अशा सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आग्रहाचे निमंत्रण आयोजकांनी दिले असून या कार्यक्रमामध्ये सहभागासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 12/Jan/2026














